शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत यांच्या पुढाकाराने आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना 5 लाखांची मदत ..
आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही...विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची ग्वाही

शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत यांच्या पुढाकाराने आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना 5 लाखांची मदत करण्यात आली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थित ही मदत देण्यात आली
बुलढाणा जिल्ह्यातील शिवणी, अरमाळ या गावातील आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी खडकपूर्णा धरणातील डाव्या कालव्याद्वारे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी दिलेले आत्मबलिदान व्यर्थ जाणार नसल्याची ग्वाही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी ५ लाख रुपयांची मदत करण्यात आली. शिवणी, अरमाळ या गावातील राहत्या निवासस्थानी दानवे यांनी नागरे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी कुटुंबातील सदस्यांसोबतच गावकरी कैलास नागरे यांच्या संघर्षशील लढ्याच्या आठवणीने गहिवरून गेले. पत्नी, तीन मुले व वडील त्यांच्या लढ्याच्या उजळा देत असताना भावूक झाले.
शेतकरी कैलास नागरे यांची पंचक्रोशीतील १४ गावांचा विचार करण्याची भूमिका होती. त्यांचे पंचक्रोशीतील गावांच्या शेतीसाठी असलेली तळमळ कधीही विसरता येणार नाही.पुढील आठवड्यात संबंधित विभागाची याप्रकरणी बैठक असून कैलास नागरे यांची भूमिका यावेळी जोरदार ताकदीने मांडले जाईल, असा विश्वास अंबादास दानवे यांनी गावकरी आणि कुटुंबीयांना दिला. आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांसह पंचक्रोशीतील १४ गावे शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुटुंबीयातील सदस्य असून या गावांना पाणी मिळाले तेव्हाच कैलास नागरे यांच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी भावना दानवे यांनी व्यक्त केली.
कैलास नागरे यांचा लढा शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुढे असाच सुरू ठेवावा,असे आवाहन अंबादास दानवे यांनी पदाधिकाऱ्याना केले.आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याला शेतीच्या सिंचनाच्या पाण्यासाठी आत्महत्या करावी लागली आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. कैलास नागरे यांनी खडकपूर्णा धरणातील राखीव पाणी मागितलेच नव्हते. धरणातून वाया जाणाऱ्या पाण्याची त्यांनी मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या पाण्यासाठी मोठ मोठाल्या प्रकल्पाची घोषणा करते मात्र प्रत्यक्षात प्रकल्पाची पूर्तता होत, नसल्याची टीका दानवे यांनी केली. याप्रसंगी आमदार सिद्धार्थ खरात,
शिवसेना सहसंपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, जयश्रीताई शेळके, आशिष राहाटे, दादाराव खारडे व नितेश देशमुख उपस्थित होते.