क्षय आरोग्य धाम येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा; तज्ज्ञांव्दारे क्षयरुग्णांना केले मार्गदर्शन*

क्षय बाधित रुग्णांमध्ये क्षय रोगाबद्दल जागरुकता निर्माण होण्यासाठी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्याने येथील क्षय आरोग्यधाम येथे क्षयरोग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तज्ज्ञांव्दारे क्षयरोग बांधित रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले.
क्षयरोगाबाबत समाजामध्ये जागरुकता निर्माण व्हावी, तसेच क्षय रोगाच्या समूळ उच्चाटनासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना गती देण्यासाठी 1982 पासून दरवर्षी 24 मार्च रोजी जागतिक क्षय दिन साजरा केला जातो. क्षयरोग हा साथीचा रोग आहे, ज्यामुळे दरवर्षी सुमारे दीड दशलक्ष लोक मृत्युमुखी पडत असतात. क्षय रोगाचे समूळ उच्चाटन व्हावे या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यासाठी दरवर्षी वेगवेगळी राबविण्यात येतात. 2025 या वर्षासाठी “होय आपण क्षयरोगाचा अंत करू शकतो! वचनबद्ध व्हा! गुंतवणूक करा व वितरित करा! अशी थीम ठेवण्यात आली आहे. ही थीम आशा, निकड आणि जबाबदारीचा एक शक्तिशाली सामूहिक संदेश देते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशील चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन डॉ. रॉबर्ट कोच यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. रुग्णालयातील आहार तज्ञ डॉ. मयुरी चौधरी (देशमुख) यांनी क्षयरोग बाधित रुग्णांनी आहार संदर्भात घ्यावयाची काळजी व अतिप्रथिनायुक्त आहाराचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. तायडे यांनी क्षयरोग रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमासंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. खान यांनी सर्व रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली.
वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद कोठारी यांनी क्षयरोगाचे समूळ उच्चाटनाकरिता केल्या जाणाऱ्या अनेकविध प्रयत्नांपैकी जागरुकता बाळगून तात्काळ केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि जागरूक नागरिक बनून लक्षणानुसार केल्या जाणाऱ्या आरोग्य चाचण्यावर भर दिला. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुशील चव्हाण यांनी अध्यक्षिय समारोपामध्ये क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी सरकारच्या विविध उपयोजना तसेच क्षयरोग बाधित व्यक्तीसाठी विविध स्तरांवरून घेतल्या जाणाऱ्या काळजी संदर्भात बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अधिपरिचारिका कालींदा जायभाय यांनी केले.