शेतकरी, युवकांना मिळणार ड्रोन प्रशिक्षण …!

केंद्र व राज्य शासनाच्या ड्रोन प्रशिक्षण योजनेची अंमलवजावणी करण्याच्या दृष्टीने बुलढाण्यात सुरु करण्यात आलेल्या ड्रोन तंत्रज्ञान कंपनी कॉनफ्लाय डायनॅमिक्स प्रा. लिमिटेडच्या प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते बुधवारी झाले. या कॉनफ्लाय डायनॅमिक्स कंपनीमार्फत जिल्ह्यातील शेतकरी, युवकांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
ड्रोनचे प्रशिक्षण, देखभाल व दुरुस्ती प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कॉनफ्लाय डायनॅमिक्सने बुलडाण्यात प्रादेशिक कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त गणेश विटोडे, प्र.जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, कॉनफ्लाय डायनॅमिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल कस्तुरे, मारुत ड्रोनटेकचे राष्ट्रीय फ्रँचायझी प्रमुख, संजय पाल, तसेच जिल्ह्यातील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला कारागीर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना ड्रोन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इलेक्ट्रिक वाहन यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा ग्रामीण भागातील विकासासाठी कसा उपयोग होऊ शकतो यावर भर दिला. त्यांनी ड्रोनचा उपयोग कीटकनाशक फवारणी, निरीक्षण आणि कृषी क्षेत्रातील इतर उपक्रमांसाठी वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
यावेळी कॉनफ्लाय डायनॅमिक्सचे सीईओ, कुणाल कस्तुरे यांनी प्रादेशिक कार्यालयातून सुरू होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यात एनएसडीसी किसान ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रम, ज्यामुळे शेतकऱ्यांना ड्रोनच्या प्रगत उपयोगाची माहिती मिळेल. दुरुस्ती आणि देखभाल प्रशिक्षण हे जे हैदराबादस्थित आघाडीच्या ड्रोन उत्पादन कंपनी मारुत ड्रोनटेकच्या सहकार्याने फ्रँचायझी स्वरूपात उपलब्ध असेल, असे त्यांनी सांगितले.
कॉनफ्लाय डायनॅमिक्सचे आगामी काळात प्रादेशिक कार्यालयाच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम, संशोधन, आणि ड्रोन उत्पादनावर भर असणार आहे. स्थानिक तांत्रिक संस्थांना ड्रोन सेंटर ऑफ एक्सलन्स आणि कौशल्य विकास कार्यक्रम स्थापन करण्यात मदत करणार असल्याचे सांगितले. याची दखल घेत जिल्ह्यात नाविण्यपूर्ण उपक्रम, उद्योग सुरु करण्यासाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहील असे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वस्त केले.
यावेळी बोलतांना कुणाल कस्तुरे यांनी कंपनीच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. त्यांनी ग्रामीण भागात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पोहोचविणे, स्थानिक लोकांना सक्षम करणे आणि प्रादेशिक स्तरावर कौशल्य विकासाला चालना देणे यावर भर असल्याचे सांगितले.
कौशल्य विकासाच्या दृष्टीने या प्रशिक्षण कार्यक्रमातून बुलडाण्यातील शेतकरी, कारागीर आणि युवकांना प्रगत तंत्रज्ञान व कौशल्य आधारित प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे मत यावेळी मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आले.