जिल्ह्यात १९ ते २४ डिसेंबर दरम्यान ‘प्रशासन राबविणार सुशासन सप्ताह !
बुलढाणा, (प्रतिनिधी ): केंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १९ ते २४ डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहांतर्गत ‘प्रशासन गाँव की ओर’ मोहीम राबविण्यात येणार असून त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.
या मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी प्र.जिल्हाधिकारी सदाशीव शेलार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री ठाकरे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र पौळ, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसिलदार संजय गांधी, विविध विभागाचे प्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या ‘सुशासन सप्ताह-प्रशासन गाँव की ओर’ मोहिमेंतर्गत प्रशासनातील विविध विभागांच्या सेवांचा लाभ नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी गावपातळीवर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने प्र.जिल्हाधिकारी सदाशीव शेलार यांनी प्रशासनाला तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आराखडा तयार करावा. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारुन घ्यावे. प्रलंबित तक्रारींचा निपटारा करुन घ्यावा. या मोहिमेला विशेष प्राधान्य देवून नियोजन करावे, असे निर्देश श्री. शेलार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
केंद्र शासनाची ही महत्त्वाकांक्षी मोहीम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवायची आहे. या मोहिमेदरम्यान विभागांनी अभिनव उपक्रम राबवावेत. विभाग प्रमुखांनी अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री ठाकरे यांनी दिले.
- ‘सुशासन सप्ताह- प्रशासन गाँव की ओर’ मोहिमेच्या अंमलबजावणीसंदर्भात २३ डिसेंबर रोजी कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत गावपातळीवर शिबिरे आयोजित करुन विविध सेवांचा लाभ दिला जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांच्या तक्रारीं, अर्जांचा निपटारा करुन सेवांचा लाभ दिला जाणार आहे., अशी माहिती याबैठकीत देण्यात आली.