होमिओपॅथी जीवन गौरव पुरस्काराचे 12 एप्रील होणार वितरण .. पहा कोणाला मिळाला पुरस्कार

होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हॅनिमन यांच्या जयंतीनिमित्त येथील आयुष विभाग व होमिओपॅथीक डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने 12 एप्रिल 2025 रोजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेत जागतिक होमिओपॅथी दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी होमिओपॅथी जीवन गौरव पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
जागतिक होमिओपॅथी दिन कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय गायकवाड यांच्याहस्ते होणार आहे. जेष्ठ होमिओतज्ज्ञ तथा पंचशील होमिओपॅथिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. दादासाहेब कवीश्वर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अजित शिरसाट यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील, इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश जतकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमात होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हॅनिमन यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच होमिओ तपस्वी स्व. डॉ.अजय ढगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या होमिओपॅथी जीवन गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार उल्हासनगर येथील प्रसिद्ध होमिओ तज्ञ डॉ. अमरसिंह गौतम, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पळसखेडा व ग्रामीण भागात होमिओपॅथीद्वारे अनेक दुर्धर आजारांवर उपचारे करणारे प्रसिद्ध होमिओ तज्ञ डॉ. बाळासाहेब ना. महानोर, डेबको या होमिओपॅथी औषध निर्मिती संस्थेचे प्रमुख नंदकिशोर देशपांडे यांना जाहिर झाला असून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी केले आहे.