स्वर्गीय कैलास नागरे यांच्या वारसांचे शासनाने स्विकारले पालकत्व ,१४ गावांना ही मिळणार पाणी …! …पालकमंत्री मकरंद पाटील

राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कारप्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी २४ मार्च रोजी आत्महत्या केली होती. या घटनेची राज्य शासनाने गंभीर दखल घेत त्यानुषंगाने पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांनी 8 एप्रीलला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठक घेतली. या बैठकीत खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी धोत्रा नंदई व इतर १४ गावांना बंदिस्त पाईपलाईनद्वारे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात अंढेरा, वाकी बु, वाकी खु, सेवानगर, पिंप्री आंधळे, शिवनी अरमाळ, नागणगाव, पाडळी शिंदे, मेंडगाव, बायगाव, सावखेड नागरे, वाघाळा आणि खैरव या गावांना खडकपूर्णाचे १६६० हे सिंचन क्षेत्रासाठीचे पाणी देण्याचा ७० कोटींचा प्रस्ताव नियामक मंडळाकडे पाठविण्यात आला आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. लवकरच या प्रस्तावाला मान्यता मिळवून १४ गावांना पाणी उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री ना.पाटील यांनी यावेळी सांगितले.
कै. कैलास नागरे यांच्या आत्महत्येला बलिदानाचा दर्जा देण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असून या मागणीविषयी त्यांना माहिती देणार आहे. कै. नागरे यांच्या वारसांचे पालकत्व शासनाने स्विकारले आहे. तसेच त्यांच्या पत्नीला नौकरी देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.