कॅडल मार्च काढून स्नेहलला वाहणार श्रद्धांजली …! अपघातस्थळी त्रिशरण चौकात होणार शोकसभा …!!

, सोमवारी बोलेरो पिकअपने धडक दिल्याने मृत्युमुखी पडलेल्या स्नेहल चौधरी हिच्या मृत्यूने कुटुंबीयांसह अख्खे बुलढाणावासीय हळहळले आहेत. शहरातून बेदरकारपणे वाहने चालविली जात असल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना आहेत. उद्या १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता कॅण्डल मार्च काढून स्नेहलला अपघातस्थळी त्रिशरण चौकात आदरांजली अर्पण केली जाणार आहे.
तालुक्यातील साखळी येथील मूळ रहिवासी व सध्या सुंदरखेडमधील चांडक लेआऊटमध्ये वास्तव्यास असलेले संदीप चौधरी यांच्या पत्नी छाया चौधरी (५५) व त्यांची मुलगी स्नेहल (२४) या स्कुटीने १० फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता आपले काम आटोपून घराकडे निघाल्या होत्या. त्रिशरण चौकात त्यांच्या स्कुटीला एमएच-२८-एबी-११८८ क्रमांकाच्या बोलेरो पिकअपच्या चालकाने धडक दिली. चालक सतीश बाहेकर दारूच्या नशेत तर्रर्र होता. या घटनेत स्नेहलचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी आईवर उपचार सुरू आहेत.
उच्चशिक्षित असलेल्या स्नेहलचा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. जनआक्रोश पाहता शहरातील विविध घटकातील नागरिकांनी उद्या १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता चांडक लेआऊट ते त्रिशरण चौक असा कॅण्डल मार्च काढून त्रिशरण चौकात श्रद्धांजलीपर सभा आयोजित केली आहे. स्नेहलला आदरांजली वाहण्यासोबतच न्याय मिळण्यासाठी नागरिकांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बुलढाणेकरांनी केले आहे.