सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ
माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतात पाळण्यात येणारा सशस्त्र सेना ध्वजदिन शनिवारी सैनिकी सभामंडप, बुलढाणा येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बुलढाण्याचे उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राधिका चव्हाण, पुर्व सैन्य भरती प्रशिक्षण केंद्राचे संचालक संचालक कर्नल सुकुमारण (नि), स्क्वॉड्रन लिडर तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. सरोदे रुपाली पांडुरंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतात ७ डिसेंबर हा “ध्वजदिन ” म्हणून पाळण्यात येतो व त्या निमित्त्याने पुढील वर्षाच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत निधी गोळा केला जातो. भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दुर करून त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे, यासाठी आणि युध्दात अपंगत्व आलेल्या व सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो.
मागील वर्षी बुलढाणा जिल्ह्याला ५३ लक्ष ३८ हजार रुपये गोळा करण्याचा इष्टांक देण्यात आला होता. बुलढाणा वासियांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हा इष्टांक ५५ लाख ९० हजार रुपये अर्थात १०५ टक्क्यांनी पूर्ण केला आहे, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.