शासकीय वार्तासमाजीक वार्ता

बचत गटांना अर्थसहाय्य देऊन विकास कार्यक्रमांना गती द्या

बुलढाणा – महिला आर्थिक विकास महामंडळ (मावीम), बुलढाणा यांच्या वतीने बचत गटातील महिलांसाठी आर्थिक सहाय्य नियोजन (क्रेडिट प्लॅन) कार्यशाळा २०२६-२७ चे आयोजन बुधवारी हॉटेल बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी येथे करण्यात आले. यावेळी बचत गटांना अधिकाधिक अर्थसहाय्य उपलब्ध करून देत त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना द्यावी आणि विकासाच्या कार्यक्रमांमध्ये बँकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक के. के. सिंग यांनी केले.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक के. के. सिंग होते. प्रमुख पाहुणे म्हणून मावीमचे विभागीय सल्लागार केशव पवार, पोखरा कार्यक्रमाच्या कृषी विभागाच्या नोडल अधिकारी श्रीमती पाटील तसेच जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे उपस्थित होते.

कार्यशाळेत विविध बँकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये एसबीआयचे रविकिरण खेडेकर, युबीआयचे अनिल देशमुख, एमकेजीबीचे बाईनोड, सीबीआईचे तायडे, बॅक ऑफ इंडीयाचे प्रसाद देशमुख व अभिजित पंडित, एचडिएफसीचे महेश बरडे, आयसीआयसीआयचे अमित वडगावे यांच्यासह खादी ग्रामोद्योग, जिल्हा उद्योग केंद्र आणि विविध संस्थांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सीएमआरसी व्यवस्थापकांनीही सहभाग नोंदविला.

यावेळी विभागीय सल्लागार केशव पवार यांनी जिल्ह्यातील बचत गट चळवळीला बळकटी देण्यासाठी बँकांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांनी जिल्हानिहाय आणि बँकनिहाय बचत गटांच्या कर्ज उद्दिष्टांची माहिती देत त्यासाठीची रणनीती उपस्थितांसमोर मांडली.

कार्यक्रमात मुंबई येथून सचिन आहेर आणि विभागीय व्यवसाय सल्लागार पवन देशमुख यांनी आभासी माध्यमातून सहभाग घेतला. कार्यशाळेत मावीमच्या वतीने १ हजार ४०३ बचत गट आणि ५०० वैयक्तिक महिला कर्ज प्रकरणांसाठी एकूण ७५.६२ कोटी रुपयांच्या कर्ज नियोजनाला मंजुरी देण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन सहायक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख यांनी केले. आभार प्रदर्शन सहायक सक्षमीकरण अधिकारी शरद शिरसाट यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महेश पाटील, विजय कदम, राजेश शेगोकार, येंडोले आणि विशाल पवार यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button