शासकीय वार्तासमाजीक वार्ता

पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी ‘अमृत पर्यटन’ उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम

बुलढाणा =महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘अमृत पर्यटन’ उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक आणि नवउद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांनी तसेच स्वयंरोजगाराच्या संधी शोधणाऱ्या युवक-युवतींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यटन क्षेत्र हे रोजगारनिर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारे आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण करणारे महत्त्वाचे क्षेत्र मानले जाते. याच पार्श्वभूमीवर अमृत संस्थेने पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांना सक्षम करण्यासाठी तसेच नवीन व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमात टूर अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिक, पर्यटक मार्गदर्शक (टुरिस्ट गाईड्स), कुक अँड केटरर्स, होमस्टे व रिसॉर्ट संचालक, धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनाशी संबंधित उद्योजक, पर्यटन सेवा पुरवठादार तसेच पर्यटन क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती सहभागी होऊ शकतात.

प्रशिक्षणादरम्यान व्यवसाय उभारणी व विस्तार, व्यवसाय नियोजन, डिजिटल मार्केटिंग, आधुनिक विपणन तंत्रज्ञान, ग्राहक व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, ब्रँडिंग, पर्यटन क्षेत्रातील नवीन व्यवसाय संधी तसेच शासनाच्या विविध योजना व आर्थिक सहाय्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय पर्यटन क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ आणि यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शनही सहभागींसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर, शेगाव, सिंदखेड राजा आणि ज्ञानगंगा अभयारण्य यांसारख्या पर्यटनस्थळांच्या पार्श्वभूमीवर पर्यटन व्यवसायासाठी मोठ्या संधी उपलब्ध असून, या संधींचा लाभ घेण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे.

‘अमृत पर्यटन’ उपक्रमाच्या माध्यमातून स्वयंरोजगार, उद्योजकता आणि स्थानिक पर्यटन विकासाला चालना देण्याचा अमृत संस्थेचा प्रयत्न आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमाणी (मो. ९११२२२७६३७) यांच्याशी अमृत जिल्हा कार्यालय, फ्लॅट क्र. ३०५, तिसरा मजला, बुलढाणा प्राइड बिल्डिंग, तहसील कार्यालयासमोर, बुलढाणा – ४४३००१ येथे संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button