महाराष्ट्रराजकीय वार्ताशेती वार्ता

दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत बुलढाण्याचा समावेश करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची मागणी*

बुलढाणा ( प्रतिनिधी ) पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, जिल्ह्याचा १८ दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत तातडीने समावेश करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनामार्फत १८ दुष्काळसदृश जिल्ह्यांचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, या यादीत बुलढाणा जिल्ह्याचा समावेश नसल्याने जिल्ह्यातील सद्यस्थितीचा तातडीने फेरआढावा घेण्याची गरज असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रात नमूद केले आहे.

बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यासह विविध खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. पिकांच्या वाढीच्या आणि उत्पादनाच्या महत्त्वपूर्ण कालावधीत पुरेसा पाऊस न झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या साप्ताहिक पर्जन्यमान अहवालानुसार २ सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यातील पर्जन्यमान सामान्यापेक्षा सुमारे ८७ टक्के कमी नोंदविण्यात आले आहे.

या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ५ सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील आवश्यक भागात हवामान परिस्थिती अनुकूल असल्यास कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यातील पर्जन्यस्थिती आणि खरीप पिकांवरील संकट कायम असल्याचे श्री. जाधव यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

बुलढाणा जिल्ह्याचा दुष्काळसदृश परिस्थितीच्या निकषांनुसार तातडीने फेरआढावा घेऊन १८ जिल्ह्यांच्या यादीत समावेश करावा, खरीप पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान सर्वेक्षण व पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार तातडीची आर्थिक मदत व पीकनुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच, हवामान परिस्थिती अनुकूल असल्यास आवश्यक भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची विनंतीही केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यातील एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी आवश्यक आर्थिक व प्रशासकीय मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button