महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षांचे वेळापत्रक जाहिर…!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2025 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) प्रसिद्ध करण्यात आले आहे. दरवर्षी आयोगाकडून पुढील वर्षीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं जाते. यामुळे विविध शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी आणि नियोजन करण्यासाठी मदत होते.
शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते, त्यानुसार सन 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापिठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादिंकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. जेणेकरुन, आयोगाच्या संबंधित संस्थांच्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाही व उमेदवारांचे नुकसान होणार नाही. यासंदर्भात विधीमंडळातही अनेकवेळा चर्चा झाली असून त्यावेळी विधीमंडळात देण्यात आलेल्या आश्वासनानुसार कोणत्याही परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यानुसार सर्व संबंधित संस्थांना प्रस्तावित वेळापत्रकाची प्रत पाठवून यासंदर्भात दक्षता घेण्याबाबत कळविण्यात आले आहे.तरी खेड्यापाड्यातील गरीब व होतकरु उमेदवारांनी संभाव्य परीक्षांचे नियोजन करुन लाभ घ्यावा.