आरोग्य वार्ताराजकीय वार्ताशेती वार्तासमाजीक वार्ता

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा वाढदिवस ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा होणार*

होर्डिंग व डिजिटल बॅनर न लावता सामाजिक उपक्रम राबविण्याचे शिवसैनिकांना आवाहन

बुलढाणा – अल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा २५ नोव्हेंबर रोजीचा वाढदिवस यंदा ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्त होर्डिंग व डिजिटल बॅनर न लावता समाजोपयोगी उपक्रम राबवून गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्याचे आवाहन शिवसैनिकांना करण्यात आले आहे.

शिवसेना नेते तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचा वाढदिवस दरवर्षी जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. मात्र, यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचा खंड पडून जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर वाढदिवसाचा खर्च दिखाऊ स्वरूपाच्या जाहिरातबाजीवर न करता समाजोपयोगी कामांसाठी करण्याची भूमिका प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला शासनाच्या मदतीचा लाभ मिळावा, यासाठी त्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्य शासनाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांचा समावेश झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती व विविध योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पावसाचा दीर्घ खंड पडल्याने पिके कोमेजून जात असताना प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच शासनदरबारी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून मदतीसाठी पाठपुरावा केला. याशिवाय, प्रकल्पांमधील उपलब्ध जलसाठ्यापैकी भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन आवश्यक पाणी आरक्षित ठेवावे आणि शिल्लक अतिरिक्त पाणी खरीप पिकांच्या सिंचनासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

या पार्श्वभूमीवर भूमिपुत्राचा वाढदिवस ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करून जिल्ह्याच्या विविध भागांत लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दुष्काळग्रस्त नागरिकांना दिलासा देणे, गरजूंच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना शक्य ती मदत उपलब्ध करून देणे आणि वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.

**विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन**

सेवा सप्ताहादरम्यान शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे, आरोग्य तपासणी व महाआरोग्य शिबिरे, दिव्यांग बांधवांसाठी शिबिरे व साहित्य वाटप, रक्तदान शिबिरे, मोतीबिंदू व नेत्रतपासणी शिबिरे, तसेच गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत देण्याचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

‘जिना सिखो’ उपक्रमांतर्गत आयुर्वेदिक शिबिरे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, स्ट्रीट फूड विक्रेते व बचत गटातील महिलांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. आरोग्य क्षेत्रात कार्यरत डॉक्टर, परिचारिका, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांचा सन्मानही करण्यात येणार आहे.

यासोबतच ‘रेबीज फ्री सिटी’ अभियानाचा प्रारंभ, रोबोटिक सर्जरी युनिट सुविधा, एनएबीएल कार्यशाळा, टू-डी इको शिबिर, महाआरोग्य शिबिर, तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातूनही नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील विविध भागांतील स्थानिक गरजा आणि परिस्थिती लक्षात घेऊन या उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च व जाहिरातबाजी टाळून समाजातील गरजू घटकांच्या सेवेला प्राधान्य द्यावे. शिवसैनिकांनी होर्डिंग व डिजिटल बॅनर न लावता सेवा सप्ताहात प्रत्यक्ष समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button