तब्बल 33 वर्षानंतर माजी आमदार राहुल बोन्द्रे यांच्या शिक्षण संस्थेवर फसवणुकीचे गुन्हे…
AICTE ची मंजुरी मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचे निष्पन्न...

चिखलीतील काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोन्द्रे यांच्या शिक्षण संस्थेवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.. बनावट आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे कॉलेजला मंजुरी मिळवल्याचं चौकशीत निष्पन्न झालं असून, या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर संस्थेच्या संचालक मंडळाविरुद्ध तब्बल 33 वर्षानंतर तीन वेगवेगळे गुन्हे चिखली पोलिसात दाखल करण्यात आले आहेत…

जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या’ विरोधात दाखल तक्रारीची चौकशी अखेर पूर्ण झाली आहे, या चौकशीत संस्थेने उभारलेल्या ‘अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय’ आणि ‘अनुराधा पॉलिटेक्निक कॉलेज’साठी लागणारे अनिवार्य शासकीय दस्तऐवज, जसे की अकृषक आदेश आणि बांधकाम परवानगी प्रत्यक्षात घेतलीच नसल्याचे समोर आले आहे, ही संस्था चिखलीतील काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोन्द्रे यांची असून या परवानग्या न घेता संस्थेने बनावट आणि ड्युप्लिकेट कागदपत्रे तयार करून ती ‘AICTE’ कडे सादर केली आणि कॉलेजची मंजुरात मिळवली, या गंभीर प्रकरणाची दखल घेत माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, पंचायत समिती, नगरपालिका आणि तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारींवरून चिखली पोलीस ठाण्यात एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.. हे संपूर्ण प्रकरण शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना कडक शिक्षा करावी, अशी मागणी तक्रारदार शैलेश गोधणे यांनी पत्रकार परिषद घे वुन केली आहे.. या घोटाळ्यामुळे ‘AICTE’ ने संस्थेच्या पुढील नवीन प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली आहे..

उपविभागीय अधिकारी यांनी चुकीचा अहवाल देऊन गुन्हे दाखल केले, सत्ताधाऱ्यांकडून शैक्षणिक सहकारी संस्था संपवण्याचा कुटील डाव केला जातोय असा आरोप करत सादर करण्यात आलेले सर्व दस्तऐवज खरे आहेत आणि आताही ते उपलब्ध आहेत, त्यामुळे आम्ही या प्रकरणी न्यायिक लढाई लढणार असल्याचही माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी स्पष्ट केला आहे…




